मुंबई : प्रतिनिधी
‘मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाणला आहे.
नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशानंतर बुधवारी (दि. 13) सुजय यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा काँग्रेसला न सोडल्यानेच नाईलाजाने विखेंना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. त्याबद्दल बोलताना ‘आपल्या मुलाचा हट्ट ज्याचा त्याने पुरवावा. दुसर्यांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू,’ असे शरद पवार यांनी म्हटले होते. पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून उद्धव यांनी पवारांना चिमटा काढला. ‘आम्ही दुसर्यांच्या मुलांचेही लाड करतो. इतरांची पोरं केवळ धुणीभांडी करण्यासाठी असतात, असा माझ्या पक्षाचा विचार कधीच नव्हता आणि असू शकत नाही. शिवसेना ही सर्वसामान्यांसाठीच आहे,’ असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी सुरुवातीला माढ्यातून निवडणूक लढण्याची केलेली घोषणा, पार्थ पवारांच्या उमेदवारीला केलेला विरोध, नंतर नातवासाठीच घेतलेली माघार या सार्या घडामोडींबद्दल उद्धव यांना विचारले असता उद्धव म्हणाले, ‘जे काही चाललंय, ते पवारांच्या नीतीला अनुसरूनच आहे. आम्ही बोलतो ते करतो, ते बोलतात त्याच्या उलटे करतात.’