कर्जत : प्रतिनिधी
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने हर्बल हँड सॅनिटाझर तयार करून, त्याचे मोफत वाटप केले. सध्या कोरोना विषाणू रोखण्यासाठी मास्क व हँड सॅनेटायझरचा सर्रास उपयोग होत असल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनिकेत इंदुलकर यांनी लॅब असिस्टंट संजय चौधरी यांच्यासह द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हर्बल हँड सॅनिटायझर तयार केले आहे. हे सॅनिटायझर तयार करताना आय सो प्रोफाईल, ग्लिसरीन, एलोवेरा जेल, इसेंशियल ऑइल वापरले. हे सॅनिटायझर लहान बाटल्यांमध्ये भरून त्यांचे शिक्षक व कर्मचार्यांना मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.