नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्यातर्फे जनजागृती
पनवेल : वार्ताहर
कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. या महामारी रोगाविरोधात अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि व्यक्ती उतरले आहेत. पनवेल मनपाचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती आणि प्रबोधन सुरू केले आहे. कळंबोलीत महत्त्वाच्या ठिकाणी माहिती फलक लावून कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याअगोदर त्यांनी इतर वस्तूंचे वाटप केले आहे. शर्मा यांनी लोकप्रतिनिधित्व आणि सामाजिक बांधिलकी जपत याकामी पुढाकार घेऊन सर्वांसमोर वस्तुपाठ ठेवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित केले आहे, तसेच यावर अद्यापही उपाय सापडला नाही. परिणामी संपूर्ण जगावर या रोगाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर या आजाराची लक्षणे तसेच काय खबरदारी घ्यायची याविषयी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रबोधन होणे आवश्यक आहे. सामाजिक जाणिवेतून आणि लोकांचा प्रतिनिधी या नात्याने नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, पोलीस ठाणे, वाहतूक शाखा या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वाटप केले, तसेच भित्तीपत्रकेही लावली. गुरुवारी रात्री कळंबोली वसाहतीमध्ये स्वखर्चातून शर्मा यांनी महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावले. त्यावर कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दर्शनीय भागात लावण्यात आलेल्या फलकामुळे जनजागृती आणि प्रबोधन होत आहे. राजेंद्र शर्मा यांनी अशा प्रकारे इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
स्वखर्चाने करणार निर्जंतुकीकरण फवारणी
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी कळंबोली परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी मशिनही खरेदी केले आहे, तसेच यासाठी लागणारी औषधेही उपलब्ध करून ठेवली आहेत. पनवेल महानगरपालिकेची परवानगी आल्यानंतर सोसायट्या तसेच सिडकोच्या घरांच्या कंपाऊंडमध्ये ते निर्जंतुकीकरण फवारणी करणार आहेत.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे या संकटात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे. त्याच भावनेतून मी कळंबोलीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना आजाराबाबत प्रबोधन आणि जनजागृती करीत आहे. अर्थात कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. महापालिका आणि तालुका प्रशासनावर अवलंबून न राहता मी वसाहतीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी माहिती फलक लावले आहेत. त्याचबरोबर मास्क, निर्जंतुकीकरण लिक्विड, पोस्टरचे वाटप केले. आणखी याकरिता जिथे जिथे जे जे करता येईल, ते मी सामाजिक बांधिलकीतून नक्कीच करीन.
-राजेंद्र शर्मा, नगरसेवक