Breaking News

फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची संख्या वाढली

मुरूड : संजय करडे
सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून उन्हाची तीव्र किरणे जमिनीवर पडू लागल्याने भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात तापमान सध्या 36 अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाल्याने लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाययोजना करून सोय उपलब्ध करून दिली आहे.
फडणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची उंच व भली मोठी झाडे असल्याने कडक उन्हातही या भागात दाट सावली असते. पक्ष्यांच्या 190 प्रजाती या ठिकाणी आढळतात. घुबड, तुरेवाला सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ यासारखे रंगीबेरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत, तर रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर,बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत.
या अभयारण्यात पक्षी व प्राण्यांसाठी वन तलाव तसेच सहा कृत्रिम बशी तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. या अभयारण्यात पाण्याचे नैसर्गिक 27 स्त्रोत उपलब्ध आहेत. वन्यजीवांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी बशी तलाव व वन तलावामध्ये चार बोरिंगसुद्धा मारण्यात आलेल्या असून याद्वारे पाणी तलावात टाकले जात आहे तसेच अन्य ठिकाणहूनसुद्धा गाडीच्या सहाय्याने पाणी आणून प्राणी व पक्षांची तहान भागवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढली असून पर्यटक व निसर्गप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply