नवी मुंबई : बातमीदार
सानपाडा नोड येथील प्रभाग 30मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग 30 मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर 12,2,7, 8,9, 10 (काही भाग), सेक्टर 11 ,15, 16, 16 ए, 17, 18, 19, 20, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. या दिवसांमध्ये मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा प्रभाग 30 मधील परिसरात उद्रेक होवून रुग्ण वाढीची संख्या पहावयास मिळते. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. जवळच्या मुंबई शहरात ओमायक्रॉनचे रूग्ण अढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग 30 मधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांनी आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, आजार झाल्यावर काय करावे, आजाराची लक्षणे काय आहेत, आजार अंगावर काढल्याने कितपत हानी होते. आजाराची साथ कशामुळे निर्माण होते. साथीचे आजार, कोरोना, ओमायक्रॉन या आजारांचा सामना कसा करावा, याबाबत प्रभाग 30 मधील रहीवाशांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रभाग 30 मध्ये महापालिकेचे पूर्वीचे तीन प्रभाग समाविष्ट झाले असल्याने प्रभाग 30 मध्ये तीन ठिकाणी तीन दिवस मार्गदर्शनपर आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वीही पांडुरंग आमले यांनी 15 जुन 2022 रोजी याच विषयावर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले होते.