Breaking News

रायगडसाठी 2600 कोटींचे करार

राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी -पालकमंत्री उदय सामंत

रायगड : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबरच छोट्या उद्योजकांनादेखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि.7) पनवेल येथे दिली. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते.
या वेळी त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी 2600 कोटी रुपयांचे 17 सांमजस्य करार करण्यात आले.
पनवेल येथील विरुपक्ष मंगल कार्यालयात आयोजित गुंतवणूक परिषदेस व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण विभाग ठाणे उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. हरळय्या उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अमलात आणण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यामध्ये उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. स्थानिक स्तरावर एक लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 50 लाखांच्या प्रोजेक्टलादेखील रेड कार्पेट मिळाले आहे. छोटे व स्थानिक उद्योजक शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्गामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. देशात परकीय गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे 18 ते 19 हजार उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत. असे केले तर बेरोजगारी दूर होईल, असे सांगून उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची काळजी शासन घेईल, असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी प्रास्तविक केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply