Breaking News

निवडणुकीत तळीरामांवर करडी नजर

जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात दारू विक्री करणार्‍या दुकानांवर तसेच मद्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांवर  निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. दुकानांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मद्य विक्रीत अचानक वाढ झाली तर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. दारू विक्रीत अचानक झालेल्या वाढीचे योग्य कारण न देणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 14) येथे पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तयारीचा आढावा घेतल्यानंतर डॉ. सूर्यवंशी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे उपस्थित होते.

आचारसंहितेच्या काळात दारूच्या दुकानांमधील मद्यसाठा दररोज तपासला जाणार आहे. सरासरीपेक्षा जास्त विक्री झाल्याचे आढळल्यास तसेच नियमित वेळेपेक्षा अधिक काळ दारू विक्रीची दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द केले जाणार आहेत. जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणार्‍यांविरोधात व्यापक कारवाई सुरु करण्याचे निर्देश पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

निवडणुकीसाठी 28 समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना व विविध पथक प्रमुख अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि एक निवडणूक खर्चाविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या मतदानापूर्वी दहा दिवस अगोदर अद्ययावत होणार आहेत. कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नाही, तरीदेखील पोलीस यंत्रणा सावध आहे. सभा, रॅली, पदयात्रा, लाऊड स्पीकर आदी परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा सुरू केली जाणार असून, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या सुविधा नावाच्या अ‍ॅपवरून ऑनलाइन पद्धतीने परवानग्या दिल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सी व्हिजील अ‍ॅपद्वारे मतदार अथवा नागरिकांनी निवडणूक आचारसंहिता काळातील येणार्‍या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची धरपकड सुरु झाली आहे. या सर्वांवर क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील कलम 107, 110, 151 आणि 144 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक काळात यापूर्वी गोंधळ घालणार्‍यांविरोधातही लवकरच पावले उचलली जाणार असून या मोहिमेअंतर्गत 150 जणांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. जिल्ह्यातून आत्तापर्यंत 10 जणांना तडीपार करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply