Breaking News

सातार्यात उदयनराजेंना आव्हान देणार; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा निर्धार

नवी मुंबई : बातमीदार

सातार्‍यातील नागरिक आता टोल नाके, एमआयडीसी, दमदाट्या, मारामार्‍या, जमिनीवरून करण्यात येणारी भांडणे यांना कंटाळली आहेत. कॉलर वर करून कामे होत नाहीत. सातरकरांना शुद्धीत राहून काम करणारा नेता हवा आहे. भाजप व सेनेने अधिकृतपणे मला सातार्‍याचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. सातार्‍यात उदयनराजेंना आव्हान देण्यास आपण तयार असल्याचा इशारा अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला. वाशी येथील माथाडी भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील बोलत होते. माझ्या मनात छत्रपतींच्या गादीबद्दल आदर आहे. उदयनराजे व माझे चांगले संबंध आहेत. माथाडी कामगार व जनतेचे प्रश्न संसदेत विचारणारा नेता हवा. माझ्या नावाची चर्चा होताच उदयनराजे आजपर्यंत जिथे गेले नाहीत तिथे जाऊ लागले आहेत.  इतकी धास्ती त्यांनी का घेतली आहे, असा सवाल त्यांनी केला. आजपर्यंत उदयनराजेंनी कोणते प्रश्न संसदेत विचारले. माथाडी कामगारांबाबत किती प्रश्न विचारले व सोडवले, असा सवाल करत थेट त्यांनी उदयनराजे भोसलेंवर टीका केली. सोमवारी (दि. 11) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे व माथाडी नेते गुलाबराव जगताप यांनी कळंबोली येथे मुख्यमंत्री व नरेंद्र पाटलांवर टीका केली होती. त्याचाही खरपूस समाचार पाटलांनी घेतला. ते म्हणाले की, शरद पवारांना व अजित पवारांना खूश करण्यासाठी तुम्ही जरूर मेळावे घ्या, मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका करताना तोल सांभाळून बोला. मेळावे घेऊन नेता बनता येत नाही. त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी सरकार दरबारी कायम पाठपुरावा व लढा द्यावा लागतो. आ. शशिकांत शिंदे यांनी सांगावे की किती वेळा ते राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना भेटले. कळंबोली येथे माथाडी कामगारांची दिशाभूल कारण्याचे काम केले आहे. मला मुख्यमंत्र्यांनी कधीही पक्षात प्रवेश कर तर कामे करीन, असे म्हटले नव्हते. निस्वार्थीपणे त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. या वर्षात अण्णासाहेब आथिर्र्क मागास विकास महामंडळातर्फे 50 हजार तरुण उद्योजक होतील. 15 वर्षांत यांच्या सरकारने माथाडी कामगारांना झुलवत ठेवले, मात्र मुख्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत अनेक प्रश्न मार्गी लावले. 16 टक्के मराठा आरक्षणा देऊन ते टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. या वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर माथाडींची अनेक कामे रखडवल्याप्रकरणी टीका केली. सातार्‍यात भवानी माता ट्रस्टचे जे सहीशिक्के आहेत ते अनेक शेतकर्‍यांच्या सातबाराच्या उतार्‍यावर आहेत. बळजबरीने ते घेतले आहेत. राजांनी मन मोठे करून ते सातबारा उतारे सहीशिक्केमुक्त करावेत. ती सगळी मते राजांना मिळतील, असा थेट आरोप नरेंद्र पाटलांनी केला.  मला उमेदवारी जाहीर केल्यास मी चांगली लढत देऊन विजयी होईन, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. माझ्या नावाची चर्चा होत असताना माझा सातार्‍यातील मित्रपरिवार खूश झाला असून जे माझ्यासोबत मिसळ खातात, मला माय डिअर फ्रेंड संबोधतात. ते नक्कीच मला मदत करतील, असा विश्वास त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता व्यक्त केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply