पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र शासने मध्यरात्रीपासून, संचारबंदी लागू करताच पहाटे पासूनच लोकांनी पनवेल मार्केट यार्ड परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली होती. शासनाने जीवनावश्यक वस्तू आणि भाज्या विक्री करण्यास परवानगी दिली आहे. अनेकांना घराजवळच वस्तू व भाज्या उपलब्ध होणार आहे. परंतु पैसे वाचवण्याच्या उद्देशाने अनेक जण आपली वाहने घेऊन भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी आले होते. हीच अवस्था मोहल्ला परिसरातही होती. अनेकांना संचारबंदी व 144 कलम काय आहे? याचे गांर्भीय नसल्याने नागरिक बिनधास्तपणे पनवेल शहरासह परिसरात रस्त्यावर उतरले होते.
हीच अवस्था नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, करंजाडे, खारघर व ग्रामीण भागात होती. अशावेळी पोलीस यंत्रणेकडून घरी राहण्याचे वारंवार आवाहन करुन सुद्धा त्यांच्या आवाहनाची दखल नागरिक घेत नसल्याचे दिसून आल्याने अखेरीस पोलिसांनी आपले दांडूके चालवण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी गर्दी किंवा वाहने रस्त्यावर काढली जात आहे. अशांविरोधात पोलिसांनी आत्ता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
काही ठिकाणी बॅरीकेट्स लाऊन रस्ते बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याचप्रमाणे कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असा काही प्रकार आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.