उरण : वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री पासून संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी उरण बाजार पेठेत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी करू नका, कामाशिवाय घराच्या बाहेर फिरू नका, किराणा दुकानांत समान खरेदी करताना अंतर ठेवा, अशाप्रकारची जनजागृती पोलीस गाड्यांतून करीत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. काही नागरिकांना समज देण्यात आला आहे. अति उत्साही व संचारबंदीचे नियम डावलणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उरण पोलिसांनी उरण-चारफाटा येथे बॅरीकेटस लाऊन रस्ता बंद करण्यात आला असून रस्तावरून येणार्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हददीतील, हनुमान कोळीवाडा, भवरा तलाव, साई बाबा मंदिर मोरा कोळीवाडा केगाव प्रवेशद्वार, केगाव ग्रामपंचायत आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तात पोलीस निरीक्षक एक, दोन, पोलीस उपनिरीक्षक, 18 कर्मचारी आदी बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आले आहेत.