Breaking News

राज्याला अवकाळीचा तडाखा

पुणे : प्रतिनिधी
पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये बुधवारी (दि. 24) विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पुण्यातील कात्रज, हडपसर या भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे काही क्षणांत रस्ते जलमय झाले. राज्यात आधीच संचारबंदी लागू करण्यात आलेली असल्याने पावसामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान, हवेत मात्र गारवा निर्माण झाला असून बदलत्या हवामानात लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यात दुपारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता. दुपारी अडीचच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले. पाठोपाठ जोराचा वाराही सुटला आणि सिंहगड रस्ता, कोंढवा, कात्रज, धनकवडी, कोथरूड परिसर, औंध या भागांमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस बरसला. यावेळी विजांचा कडकडत सुरू होता. पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. शहरांमध्ये घरा बाहेर फिरायला बंदी असल्यामुळे घरातूनच लोकांनी पाऊस पहिला. शहरात मंगळवारी दुपारी आणि रात्रीदेखील पाऊस पडला होता पण आज पावसाचा जोर जास्त होता.

पोलादपूरमध्ये धुवाँधार पाऊस; सवादमध्ये इमारतींचे नुकसान
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील सवाद, धारवली, कालवली, वावे, माटवण, हावरे भागात पावसाने धुवाँधार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि हवेत गारवा निर्माण करणारा बोचर्‍या थंडीचा पाऊस गुढीपाडव्याच्या दिवशी पडल्याने वातावरण प्रफुल्लित झाले, मात्र या पावसापूर्वीच्या वादळी वार्‍याने अनेक घरांचे पत्रे  छतापासून उचकटून उडाले, तर काँक्रीटच्या पत्र्यांचे तुकडे तुकडे होऊन सर्वत्र विखुरले.
सवाद मोहल्ल्यातील घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही खोलगट भागात तलावासारखे पाणी साचले. लहान मुलांनी निरागसपणे या डबक्यात उड्या मारून आनंद साजरा केला.
सायंकाळी पोलादपूर शहरावरही वादळी वार्‍यासह पावसाचे घोंघावणे सुरू झाले. यादरम्यान महावितरणने वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित करून पोलादपूरकरांना चांगलाच घाम फोडला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply