वस्तू महागल्या; नागरिक हैराण
शासनाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी
उरण : वार्ताहर : सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याचा काही लोक फायदा घेत चढ्या दराने भाजीपाला व काही जीवनावश्यक वस्तू विकत असल्याचे उरण तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उरणकर करीत आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उरण शहरात उरण पोलीस ठाणे, उरण नगरपरिषद यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. सकाळी जीवनावश्यक सामान खरेदीसाठी नागरिक शिस्तीचे पालन करीत आहेत. उरण बाजारपेठेत नगरपरिषदेने किराणा दुकान, भाजीपाला, दुध डेअरी, मेडिकल आदी दुकानांसमोर पांढर्या रंगाचे चौकोनी बॉक्स आखून दिलेले आहेत. त्यामध्येच उभे राहुन व रांगेत उभे राहुन सामान खरेदी करावयाची आहे. त्याप्रमाणे नागरिक त्याचे पालन करताना दिसत आहेत. पोलीस प्रशासन बाजार पेठेत लक्ष देऊन नागरिकांना रांगेचा फायदा, शिस्तीचा फायदा सांगतांना दिसत आहेत. त्याचप्रमाणे गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवावे असे सांगतांना दिसत आहेत. असे असताना उरणच्या दुकानातील कांदे, बटाटे, कोथिंबीर, मेथी (पालेभाजी), आदींचा तुटवडा पडल्यामुळे काही व्यापारी जास्त दराने माल विकत असल्याचे दिसत आहेत, मेथी 20 रुपये मिळणारी जुडी आता 60 रुपये झाली आहे. कोथिंबीर 10 रुपयास मिळणारी जुडी आता 30 रुपयाने विकली जात आहे. बटाटे 25 रुपये किलो विकले जाणारे आता 40 रुपये किलो दराने विकले जात आहे. कांदे 20 रुपये किलो विकले जाणारे आता 45 रुपये किलो भावाने विकले जात आहे. कलिंगड 50 रुपयास नग आता 120 रुपये नग अशा दराने विकले जात आहे. द्राक्षे 80 रुपये किलो मिळणारी आता 120 रुपये किलो या भावाने विकली जात आहेत. फळ, किराणा, भाजीपाला चढ्या भावाने विकले जात आहेत. चढ्या भावाने वस्तू विकणारे व्यापारी यांच्यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
या महागाई बद्दल एका फळ व्यापार्यास विचारले असता आम्ही वाशी (नवी मुंबई) एपीएमसी येथे माल खरेदी करण्यास मोठी लाईन असते बराच वेळ जातो दोन ते तीन तास खरेदी करण्यास लागतो व मालाला तुटवडा असल्याने पडवडत नाही त्यामुळे चढ्या भावावे विकावे लागते, असे त्याने सांगितले.
मार्केट मध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येणार्या नागरिकांकडून विक्रेते जादा पैसे आकारून लुट करीत आहेत. याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे तसेच पोलीस यंत्रणा यांनी जनतेची लुट करणार्या व्यवसाईक, विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उरणचे नागरिक करीत आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून बाजारपेठेत चांगली उपाययोजना केली जात आहे. परंतु पालेभाजी व इतर भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. कोणतीही भाजी घ्या दुप्पट भावाने विकली जाते, कमी करायला विक्रेत्यास सांगितले तर पडवडत नसेल तर नका घेऊ अशी उत्तरे भाजी विक्रेत्यांकडून दिली जातात. या समस्येकडे संबधित अधिकार्यांनी लक्ष द्यावेत.
– नंदा घरत, गृहिणी