उरण : प्रतिनिधी
ब्रेन डॉग्लास स्तील या दुबई येथून आलेल्या एका कॅनडा येथील संशयास्पद कोरोना रुग्णास ताब्यात घेऊन त्याला काल बोकडविरा-उरण येथील केअर पॉईंट रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती ओएनजीसी येथे कंत्राटी काम घेत असल्याचे सांगण्यात येते. 12 तारखेला दुबईतून ही व्यक्ती मुंबईत वास्तव्याला होती. 22 तारखेपासून ती उरण-नागाव येथील हॉटेल उरण प्लाझा या हॉटेलवर राहायला होती. नागाव ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच मोहन काठे आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांना माहिती मिळताच त्यांनी या संबंधीची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांना दिली. त्यानुसार आरोग्य विभागाचे पथक घेऊन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील, हवालदार सचिन गोडे यांच्यासह पोलीस पथकाने नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या ’उरण प्लाझा’ हॉटेलवर छापा टाकला आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र हॉटेलच्या व्यवस्थापकांनी त्यांना ताब्यात देण्यास नकार देताच पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देताच या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. या ब्रेन डॉग्लास स्तील नावाच्या कॅनडा येथील व्यक्तीला उरण-बोकडविरा येथील केअर पॉईंट या रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली आहे.