पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे संपूर्ण देशात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्फ्यू जाहीर केला. या वेळी मेडिकल, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डी मार्ट सारख्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरचा यामध्ये समावेश आहे. पण या डिपार्टमेंटल स्टोअरमुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करून डी मार्ट बंद करण्याची मागणी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी (दि. 24) देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केले. यामधून किराणा दुकाने वगळण्यात आली. पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघरमध्ये डी मार्ट डिपार्टमेंटल स्टोअर आहेत. या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात. येथे रॅकवर वस्तु ठेवलेल्या असतात. तेथे खरेदीसाठी आलेले नागरिक प्रत्येक वस्तु हाताळून पुन्हा ठेवत असतात. त्यामध्ये कोणी संक्रमित असल्यास त्यापासून संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. याठिकाणी अनेक सुशिक्षित नागरिक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन खरेदीसाठी आलेले दिसून येत आहेत. त्यांना जास्त धोका आहे.
किराणा मालाच्या दुकानात ही मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. पण या दुकानात आपण मागितलेली वस्तु दुकानदार काढून देतो. त्यामुळे या वस्तू सगळ्यांकडून हाताळल्या जात नाहीत. पण डी मार्ट डिपार्टमेंटल स्टोअर असल्याने तेथे अनेकजण वस्तु हाताळतात. यामुळे संक्रमणाचा धोका जास्त असल्याचे दिसून येत आहे म्हणून डी मार्ट बंद करण्याची मागणी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केली आहे.