Breaking News

आरबीआयकडून व्याजदर कपात

इएमआयला तीन महिने स्थगिती देण्याची बँकांना विनंती

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने शुक्रवारी (दि. 27) मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात 0.75 टक्क्याची कपात करून तो 4.40 टक्के केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होऊन मासिक हप्त्याचा (इएमआय) भार हलका होणार आहे. याशिवाय तीन महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे.
बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर तीन टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना 1.7 लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या 30 जूनपर्यंत बाजारात 3.74 लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून इएमआय भरण्यापासून सूट मिळावी किंवा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कर्जदारांकडून करण्यात येत होती. त्याची दाखल घेत आरबीआयने तीन महिने मासिक हप्ते स्थगित करण्याची घोषणा केली. यामुळे कोट्यवधी कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधून बँकिंग सेवेला वगळण्यात आले आहे, मात्र बँकांनी कामकाजाचा कालावधी निम्मा केला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या पतधोरण समितीने नियोजित वेळापत्रकाचा आठवडाभर आधीच बैठक घेतली ज्यात समितीने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. आरबीआयने रेपो रेट 0.75 टक्के घटवून 4.40 टक्के केला आहे, तर रिव्हर्स रेपो रेट 0.90 टक्के घटवून 4 टक्के केला असल्याचे दास यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply