Breaking News

महायुतीला महाजनादेश मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा ठाम विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

युती होईल का, हा प्रश्न इतरांच्या मनात होता, पण आमच्या मनात कधीच नव्हता, असे सांगून बाहेरच्या पक्षातील जे योग्य होते त्यांना शिवसेना-भाजपने प्रवेश दिला.  त्याच वेळी निष्ठावंतांनाही तिकीट दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उमेदवारीच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, तिकिटे कापली म्हणणे योग्य नाही, जबाबदारी बदलली आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकले नाही, तर त्यांना जागा दाखवून दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी या वेळी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत ते मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असे नमूद करून राज्यात कधी कुणाला मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल, असा दावा केला.

पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दि. 4) दाखल केला. नागपूरसह राज्यात मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी प्रमुख नेते होते. तत्पूर्वी भाजपकडून भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला नक्कीच मिळेल. नागपूरमधील सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू, तसेच राज्यातही मोठा विजय मिळवू.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply