Breaking News

रायगडच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

शिवसेना नेत्यांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

पनवेल ः विशेष प्रतिनिधी
रायगडातील शिवसेना नेत्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगडात या दोन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे.  
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची गुरुवारी (दि. 24) मुंबई येथे बैठक झाली. या वेळी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही नाराजी व्यक्त झाली.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरू झाले. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील एका आमदाराला मंत्रिपद मिळेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असूनही त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यानंतर किमान रायगड जिल्ह्याचे पालकमंंत्रिपद इतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याला मिळेल, अशी अपेक्षा रायगडातील शिवसैनिकांना होती, मात्र तसेही झाले नाही. आदिती तटकरे यांनाच रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले.
रायगडात निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदतनिधीचे वाटप करताना पालकमंत्री शिवसेनेला डावलतात, अशी नाराजी शिवसेनेचे आमदार करीत होते. आता पुन्हा थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोरच शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुढील निवडणुका एकत्रित लढवण्याच्या चर्चा होत असल्या, तरी रायगड जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.
महाआघाडीत काँग्रेसचीही होतेय घुसमट
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील महाविकास आघाडीच्या बुरुजाला रायगड जिल्ह्यातून सुरूंग लागण्याची लक्षणे दिसत आहेत. रायगडच्या पालकमंत्र्यांवरील शिवसेनेची नाराजी आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते, माजी आमदार माणिक जगताप हे खासदार सुनील तटकरेंवर करीत असलेले शाब्दिक हल्ले आघाडीत बिघाडी निर्माण करून या धूमसणार्‍या आगीत यादवी तेलाचे काम करीत आहेत.
महाराष्ट्र सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी अनुभवत आहे. अशातच शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही रायगड जिल्ह्यात शिवसेना ही विरोधी पक्षात असल्याच्या भूमिकेत आहे. सत्तेत प्रबळ वाटा असूनही शिवसेनेच्या तीन आमदारांच्या पदरी काहीच पडत नाही. ही याचिका घेऊन पालकमंत्री बदला असा टाहो या आमदारांनी वारंवार ‘मातोश्री’कडे केला आहे, पण मुख्यमंत्र्यांना ‘बारामती’च्या आदेशाशिवाय काहीच करता येत नाही. त्यामुळे हंबरडा फोडण्यापलीकडे रायगडातील शिवसेना काहीच करू शकत नाही. दुसरीकडे जिल्ह्याची सूत्रे हलविणारे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या निर्णयाला आव्हान देत विरोध करण्याचे काम काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप करताना दिसत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply