नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या ’माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचा पहिला टप्पा नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ऑक्टोबरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला असून 14 ऑक्टोबरपासून दुसर्या टप्प्यातील सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या तीन लाख 16, हजार 449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे तीन लाख 35 हजार 469 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या 670 पथकांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये तब्बल 10 लाख 53 हजार 896 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. दुसर्या टप्प्यात आधीच्या सर्वेक्षणात नोंदणी करण्यात आलेल्या कुटुंबांना ही पथके पुन्हा भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती घेऊन शासनाच्या पमध्ये नोंदविणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात घेतलेली नागरिकांची माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध असल्याने दुसर्या टप्प्यात त्या नागरिकांचे सद्यस्थितीतील शारीरिक तापमान व ऑक्सिजन पातळी मोजून पमधील त्यांच्या नावासमोर नोंदविली जाणार आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील सर्वेक्षणाकरिता या पथकांना दररोज 75 ते 100 घरांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात जी घरे बंद आढळली, ती घरे उघडी आढळल्यास त्या कुटुंबाचीही सर्वेक्षणात नोंद केली जाणार आहे.’
नवी मुंबईकर नागरिक नेहमीच चांगल्या कामात सहकार्य करण्यासाठी आघाडीवर असतात. त्यानुसार ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातही नवी मुंबईकर नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभल्यानेच शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगली कामगिरी नवी मुंबई महानगरपालिका करू शकली असून आता दुसर्या टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणासाठी घरोघरी येणार्या महानगरपालिकेच्या पथकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका