महाड ः प्रतिनिधी
संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने प्रवासी वाहने बंद आहेत. त्यातच मुंबई-पुणेसारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोकणातील चाकरमानी भयभीत होऊन आपल्या गावी परतू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक गावांत हे चाकरमानी पायी चालत येत असून यामुळे धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी असताना जिल्हा हद्दीतच या नागरिकांना ताब्यात घेतले जात नाही. यामुळे प्रशासन खबरदारी घेण्यात चालढकल करीत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याबाबत जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर खबरदारी घेतली जात असली तरी गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भयभीत नागरिक पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहनांना पूर्णतः बंदी असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प आहे. यावर मुंबई, पुण्यामधील चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी थेट पायी जाण्याचा निर्णय घेत रेल्वे रुळावरून प्रवास करीत गाव गाठत आहेत. महाड आणि परिसरातही हे चाकरमानी दाखल होत असून जिल्हा हद्द असलेल्या पनवेलमध्ये या नागरिकांना का थांबवण्यात येत नाही, याबाबत स्थानिक नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
पोलादपूर तहसील कार्यालयालादेखील नागरिकांची सुविधा करण्याचे सुचवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे, मात्र खेड आणि तळ कोकणात जाणारे नागरिक रेल्वे रुळाने निघून गेल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मुळातच मुंबईहून पायी येणार्या नागरिकांचा लोंढा पनवेलमध्ये थांबवणे अपेक्षित असताना जिल्हा प्रवेश कसा दिला गेला, असा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित
झाला आहे. प्रवास करण्यासाठी अनेकांनी रुग्णांचा आधार घेत रुग्णवाहिकेचादेखील वापर सुरू केला आहे. महाराष्ट्रातून रुग्णवाहिकेतून रुग्ण आणि प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे यामुळे दिसून येत आहे. याकरिता अव्वाच्या सव्वा भाडेदेखील आकारले जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.