पनवेल : शहर वाहतूक शाखेतर्फे करंजाडे येथील कातकरीवाडीत 100च्यावर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सुरवाडे, पोलीस हवालदार उमेश उटगीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोविंद आदींनी त्या ठिकाणी जाऊन हे वाटप केले आहे.
करंजाडेत तरुणाची आत्महत्या
पनवेल : राहत्या घरात अज्ञात कारणावरून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना करंजाडेमध्ये घडली आहे. कन्हैय्या रामनाथ गुप्ता (वय 20, रा. करंजाडे, 203, साई प्रेसिडेन्सी, सेक्टर-4) या तरूणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरातून हॉलच्या गॅलरीला असलेल्या लोखंडी ग्रीलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.
कोकणात जाणार्यांची निवारा केंद्रात रवानगी
पनवेल : मुंबई उपनगरातून पायी कोकणात जाणार्या 12 जणांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शेडूंग टोलनाका येथे ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या क्रीडा संकूल येथील निवारा केंद्रात करण्यात आली आहे. शेडूंग टोलनाका येथे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण व त्यांचे पथक नाकाबंदी व वाहने तपासणी करीत असताना 12 जण, त्यामध्ये नऊ मोठ्या व्यक्ती व तीन लहान मुले हे कोकणात पायी चालले होते. यासंदर्भात त्यांची माहिती घेऊन या सर्वांची रवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या क्रीडा संकूल येथील निवारा केंद्रात करण्यात आली आहे.