राज्यातील अनलॉकला आठवडा पूर्ण
मुंबई ः प्रतिनिधी
अनलॉकनंतर शुक्रवारी (दि. 11) राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 5 जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचे प्रमाण या आधारावर जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी पाच टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगरपालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेवून निर्बंध कठोर होतील याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील. दरम्यान, मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच 4.40 टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने मुंबई महापालिका काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे.
जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट
अहमदनगर 2.63, अकोला 5.37, अमरावती 4.36, औरंगाबाद 5.35, बीड 5.22, भंडारा 1.22, बुलडाणा 2.37, चंद्रपूर 0.87, धुळे 1.6, गडचिरोली 5.55, गोंदिया 0.83, हिंगोली 1.20, जळगाव 1.82, जालना 1.44, कोल्हापूर 15.85, लातूर 2.43, मुंबई शहर आणि उपनगर 4.40, नागपूर 3.13, नांदेड 1.19, नंदुरबार 2.06, नाशिक 7.12, उस्मानाबाद 5.16, पालघर 4.43, परभणी 2.30, पुणे 11.11, रायगड 13.33, रत्नागिरी 14.12, सांगली 6.89, सातारा 11.30, सिंधुदुर्ग 11.89, सोलापूर 3.43, ठाणे 5.92, वर्धा 2.05, वाशिम 2.25, यवतमाळ 2.91.