
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण या आदेशाला हरताळ फासताना दिसत आहेत. त्यातच बोर्ली पंचतन येथे मुख्य रस्त्यावर व परिसरात मोकाट गुराढोरांचा मुक्त वावर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येणार्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावणार्या पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांनाही यामुळे अडथळा येत आहे. त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वाहनांचा हॉर्न वाजवूनही गाय अथवा बैल रस्त्यावरून बाजूला हटण्यास तयार नसतात. या रस्त्यावर बसलेल्या गुरांना वाहन धडकून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गुरांचे मालक मात्र हा प्रकार मख्खपणे पाहतात. कोंडवाडा बांधून या गुरांची त्यात रवानगी करावी, तसेच गुरांच्या मालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोकाट गुरांचा कळप दिवसा व रात्री रस्त्याच्या मधोमध ठाण मांडत असल्याने जीवघेण्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. अनेकदा दोन बैलांच्या झुंजीसुद्धा पाहावयास मिळतात. या मोकाट गुरांच्या मालकांवर ग्रामपंचायतीने गुन्हे दाखल करून नागरिकांना व बंदोबस्तावरील पोलिसांना होणारा मनस्ताप कमी करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.