प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट
माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.
निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदने देऊन लक्ष वेधले होते. कोरोनाविरोधात लढण्यासाठी शासनाने वज्रमूठ करून जनतेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत, मात्र निजामपूरला भीषण पाणीटंचाई असताना पहूर धरणाचे विनावापरातील पाणी निजामपूरला देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे नागरिकांना संचारबंदीतही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
कोशिंबळे नदीवरील बंधारा कोरडा पडल्याने बंधार्याच्या पाण्यावर अवलंबून असणार्या निजामपूरसह चार महसुली गावे व वाडी येथील 16 हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईकडे संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने कोरोनाच्या साथीतच नागरिकांना पाण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे.
निजामपूरपासून काही अंतरावर पहूर धरण आहे. या धरणात मुबलक पाणी असून धरणातील पाण्याचा वापर केला जात नाही. हे विनावापरातील पाणी निजामपूरला दिल्यास तात्पुरत्या स्वरूपात निजामपूरचा पाणीप्रश्न सुटेल, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.