Breaking News

ऐन दिवाळीत पोलादपूरकरांचा नगरपंचायतीच्या नावाने शिमगा

पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची वणवण

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना वारंवार नादुरूस्त होत असल्याने पोलादपूरकरांवर ऐन दिवाळीत नगरपंचायतीच्या नावाने शिमगा करण्याची वेळ ओढवली आहे. शहरातील जवळजवळ सर्वच प्रभागांमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, मात्र दिवाळीत आंघोळीला पाणी नसताना उटणे वाटप करून नगरसेवकांनी नागरिकांची थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे.

पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील विस्तारित नळ पाणीपुरवठा योजना भूमिपूजनापासूनच वादग्रस्त ठरली आहे. नसून अडचण असून खोळंबा या तत्त्वावर ही योजना रडतखडत सुरू आहे. अलीकडे या नळ पाणीपुरवठा योजनेत सातत्याने बिघाड होत असून त्यामुळे शहरातील विविध भागांतील ग्रामस्थांना पाण्यापासूच वंचित राहावे लागत आहे.

ऐन दिवाळीच्या सणात मोटरपंप बंद पडल्याने रविवारपासूनच पोलादपूर शहरातील नळ पाणीपुरवठा बंद झाला आणि नागरिकांनी नगरपंचायतीच्या नावाने शिमगा करण्यास सुरुवात केली. शहरातील गोकुळनगर, सैनिकनगर परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने आणि त्या भागात पर्यायी जलस्त्रोतांची उपलब्धता नसल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता होती, मात्र नगरपंचायतीचे प्रशासन दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. मोटरपंपाची दुरूस्ती करून झाल्यानंतर चौथ्या दिवशी पोलादपूर शहरात नळाद्वारे काही भागांत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply