व्यवहाराची चौकशी प्रगतिपथावर; सिडकोतर्फे स्पष्टीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे कोयना प्रकल्पग्रस्तांना मौजे ओवे येथे वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहाराच्या चौकशीचे काम प्रगतिपथावर असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले.
मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सिडको अधिसूचित क्षेत्रातील कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सर्व्हे. क्र. 183मधील गेल्या 15 वर्षांतील जमिनींच्या व्यवहारांची तसेच संबंधित अन्य प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय क्र.सीआयडी-3318/प्र.क्र.210/नवि-10,दि. 03 ऑक्टोबर, 2018 अन्वये एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून दिनांक 14 जानेवारीपासून सदर समितीचे काम सुरू झाले आहे.
या अनुषंगाने वर्तमानपत्रात जाहिरातदेखील देण्यात आली होती. सदर प्रकरणाविषयी समितीकडे माहिती देण्याचा कालावधी दिनांक 15 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 निश्चित करण्यात आला होता. यादरम्यान चौकशीच्या प्रथम टप्प्यात समितीकडे काही माहिती प्राप्त झाली आहे, तर आणखीन काही माहिती प्राप्त होणे बाकी आहे. प्रथम टप्प्यात मिळालेल्या माहितीची छाननी करून समितीच्या अध्यक्षांनी चौकशीच्या दुसर्या टप्प्यात गरजेनुसार नवीन पत्रव्यवहार केला असून संबंधितांकडून माहिती येणे बाकी आहे. चौकशी समितीचे काम प्रगतिपथावर असून चौकशीसंदर्भात मिळणार्या प्रतिसादानुसार समितीचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.