उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोना संसर्ग होऊ नये त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे त्या संबंधी सूचना व आवाहन करण्यासाठी उरण पोलिसांनी गुरुवारी (दि. 9) सकाळी उरण शहरात न्हावा-शेवा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरात पोलीस मार्च काढण्यात आला.
विनाकारण व अवास्तव घरातून बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देण्यांत येईल असा सावधतेचा इशारा देण्यात आला. त्याचप्रमाणे कामाशिवाय फिरणार्यांवर बळाचा वापर करण्यासंदर्भात इशारा पोलिसांकडून देण्यात आला. पोलीस मार्च उरण शहरातील उरण पोलीस ठाण्यापासून पुढे गांधी चौक, स्वामी विवेकानंद चौक, वैष्णवी हॉटेल, उरण कोर्ट, एन आय, हायस्कूल, कामठा, लाल मैदान, उरण चारफाटा, डाऊरनगर, करंजा रोड, बालई रोड, कोट नाका, राघोबादेव मंदिर, जरीमरी मंदिर, राजपाल नाका, देऊळवाडी, बाजार पेठ उरण बाजार, पुढे उरण पोलीस स्टेशन येथे सांगता समारोप करण्यात आला. तिथे पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये एकूण 54 कर्मचारी पोलीस वाहतूक शाखा, उरण पोलीस ठाणे, वार्डन, होमगार्ड आदींचा समावेश होता. तालुका वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, होनमाने, काठे, पोलीस उपनिरीक्षक वायकर आदी उपस्थित होते.