रोहे : प्रतिनिधी
देशभर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, मात्र रोह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाने गर्दी होऊ लागल्याने येथे 10 ते 13 एप्रिलदरम्यान पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यास शुक्रवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रोहे व अष्टमीतील काही सजग व जागरूक नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे नगर परिषद प्रशासनाला सूचवले होते. गर्दी कमी करून कोरोना संसर्गाला प्रतिबंद म्हणून हा उपाय पुढे आला होता. त्यास लोकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. रोहा शहरातील राम मारुती चौक, मुख्य बाजारपेठ, अडवी बाजारपेठ, फिरोज टॉकीज ते दमखाडी नाका आदी परिसर शुक्रवारी मोकळा झालेला दिसून आला. एखाद-दुसरी व्यक्ती सोडल्यास सर्व रस्ते निर्मनुष्य होते.
दमखाडी नाका, ब्रेण्डा कॉम्प्लेक्स, पालिका चौक, अष्टमी पूल यासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात होती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी औषध दुकाने व दुध डेअरी मर्यादित वेळेत चालू ठेवण्यात आली आहेत. रोह्याआधी महाडमधील व्यापारी, सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत 14 एप्रिलपर्यंत पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …