उरण : रामप्रहर वृत्त
सोनारी गावाच्या सरपंच पुनम महेश कडू यांनी आपल्या गावातील डॉक्टरांच्या मागणीची दखल घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकर्यांना मास्कचे वाटप करत गावातील दवाखान्यातील डॉक्टरांना ही मास्कबरोबर मेडिकल साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सरपंच पुनम महेश कडू यांनी गावकर्यांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या उपक्रमांबद्दल डॉक्टर व गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सध्या कोरोनाचे संकट देशबांधवांवर घोंगावत आहे. अशा कोरोनाच्या संकटातून देशबांधवांना वाचविण्यासाठी शासन तसेच गाव, शहरी भागातील डॉक्टर परिचारिका पोलीस यंत्रणा ही मेहनत घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोनारी गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावात औषधांची फवारणी करावी, रहिवाशांना मास्कचे वाटप करण्यात यावे तसेच गावात वैद्यकीय सेवा बजावणार्या डॉक्टरांसाठी मास्क, मेडिकल साहित्य उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी सोनारी गावातील डॉ.किरण अनंत मोकल, डॉ. अरुण भगत, डॉ. अविनाश तांडेल, डॉ. हरिओम म्हात्रे, डॉ. राजेश भावसार यांनी सोनारी ग्रामपंचायतकडे केली होती.
सोनारी गावाच्या सरपंच पुनम महेश कडू यांनी डॉक्टरांच्या मागणीची दखल घेऊन गावात औषधांची फवारणी, गावकर्यांना जीवनावश्यक वस्तूंबरोबर मास्कचे वाटप तसेच गावातील डॉक्टरांना मास्क बरोबर मेडीकल साहित्याचे वाटप करण्याचे काम हाती घेतले आहे. सरपंच पुनम महेश कडू यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या या समाजाभिमुख कार्याबद्दल गावातील डॉक्टरांनी सरपंच पुनम महेश कडू व त्यांचे सहकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.