महाड : प्रतिनिधी
देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना भाजप महायुतीची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, नरेंद्र मोदींसारखे कणखर पंतप्रधान होण्यासाठी निष्कलंक व सदाचारी अनंत गीते यांना लोकसभा निवडणूकीत निवडून द्या, असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील युवा सेना आयोजित जाहीर सभेत केले.
मुंबईतील बॉम्बस्फोटाची मालिका, अतिरेकी हल्ल्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार केवळ चर्चा करीत बसले, मात्र अतिरेकी हल्ल्यात आपले 42 जवान शहीद झाले, त्यावेळी बारा दिवसात सर्व लष्करी दलाच्या प्रमुखांशी चर्चा करून पाक हद्दीत घुसून जशास तसे उत्तर केवळ कणखर पंतप्रधान मोदीच देऊ शकले. म्हणून मोदी पंतप्रधान होण्यासाठी अनंत गीते यांना विजयी करा, असे आमदार गोगावले म्हणाले.
15 वर्ष सत्ता असताना विरोधकांनी रायगडचा विकास का केला नाही, असा सवाल करीत युवा सेनेचे जिल्हाधिकारी विकास गोगावले यांनी रायगडचे खासदार व महाडच्या आमदारानी आपला शंभर टक्के निधी विकासकामांवर खर्च केला असल्याची माहिती दिली.
ज्यांना जिल्हा परिषदेत आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्यांनी प्रथम तटकरेंना निवडून आणून दाखवावे, मग माणिकरावांना निवडून आणण्याची भाषा करावी, असे आव्हान विकास गोगावले यांनी आमदार जयंत पाटील यांना दिले. खासदार अनंत गीते यांना पुन्हा खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदमाकर मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, तालुका प्रमुख सुरेश महाडीक, शहरप्रमुख नितीन पावले, नगरसेवक चेतन पोटफोडे, सुनिल अगरवाल विरोधी पक्षनेते दिपक सावंत, युवा सेनेचे इम्रान पठाण, विकी शिंदे, शेखर राखाडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.