कर्जत : बातमीदार
शहरातील महावीर पेठेमधील मिरची बाजार लॉकडाऊन काळात बंद राहणार आहे, तर बाजारपेठेतील फेरीवाले आणि फुटपाथवर भरविला जाणारा भाजीपाला बाजार उठविण्यात आला असून तो आता पोलीस मैदानात भरवला जाणार आहे.
कर्जत शहरात खरेदीसाठी येणारे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शहरातील जागरूक नागरिकांकडून नगर परिषद आणि पोलिसांना सांगितले जात होते. रस्त्याच्या कडेला टोपलीमध्ये भाजीपाला घेऊन काही महिला आणि फेरीवाले यांची गर्दी असते. त्याचवेळी मिरची विक्री करणारी दुकाने काही दिवसांपासून गजबजलेली होती.
कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कर्जत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बाजारपेठेत फुटपाथवर भाजीपाला विकणार्यांचा माल जप्त केला. त्याचवेळी प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी महावीर पेठ भागात असलेल्या मिरची विक्रेत्या व्यापार्यांना पालिकेत बोलावून लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद ठेवण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे रस्त्यावर बसणारे भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले यांना एका ठिकाणी म्हणजे पोलीस मैदानात व्यवसाय करणे बंधनकारक करण्यात आले आहे.