उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग विषाणूचा वाढत चाललेला फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर संस्कार फाऊंडेशन, पंचायत समिती उरण आणि तालुक्यातील ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण उरण तालुक्यात गावागावात निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच उरण नगरपरिषदे मार्फत संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्यातील जिल्हाधिकार्यां मार्फत पंचायत समिती, नगरपरिषदेला सूचना देण्यात येऊन आपाआपल्या परिसरातील निर्जंतुकीकरण करण्यात यावे याचे पालन करित पंचायत समिती उरण यांच्या मार्फत तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घराबाहेर गल्लीमध्ये रस्त्यावर निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. स्वतः सभापती अॅड. सागर कडू, उपसभापती शुभांगी पाटील, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य या फवारणीसाठी नियोजन करत आहेत. याला सहकार्य म्हणून तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था पुढेयेत आहेत. तसेच उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांच्या नियोजनाने नगर पालिका हद्दीतील शहरातील मच्छीमार्केट, भाजीमार्केट, फुलमार्केट शहरातील रस्ते गल्ली इमारतीच्या बाहेर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.