Breaking News

कुंभे जलविद्युत प्रकल्प रखडला

राज्य शासन, स्थानिक नेत्यांची उदासीनता कारणीभूत

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कुंभे गावालगत असणार्‍या डोंगरात शासनाने कुंभे जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. वीजनिर्मिती तसेच शेती व पिण्यासाठी पाणी पुरविण्याच्या हेतूने प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य व गती देण्यात आली होती, मा़त्र शासन व स्थानिक नेत्यांची उदासीनता आणि कोकणच्या विकासाविषयीच्या आकसामुळे 15 वर्षांनंतरही कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कुंभे जलविद्युत प्रकल्पाला 15 ऑक्टोबर 1998मध्ये 100 कोटींची मान्यता मिळाली. या प्रकल्पाकडे जाणार्‍या रस्त्यावरील बोगद्यासाठी 11 एप्रिल 2002 रोजी वनविभागची मान्यता मिळाली. 17 नोव्हेंबर 2006पासून कुंभे धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. बोगदा खोदून प्रकल्पापर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला. पुढे प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी कार्यकारी अभियंता नी. रे. कारीमुंगी व त्यांच्या सहकार्‍यांनी काळ आणि कुंभे प्रकल्प एकत्र केले. त्यामुळे वीजनिर्मितीबरोबरच सिंचन व औद्योगिक वसाहतीला पाणी उपलब्ध होणार होते.

वीजनिर्मितीबरोबरच या प्रकल्पातून माणगाव व महाड तालुक्यांतील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार होता. अनेक गावांतील शेती ओलिताखाली येऊन हरितक्रांती झाली असती. त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या भागाला महत्त्व येऊन कोकणचा कॅलिफोर्निया झाला असता, मा़त्र 15  वर्षांनंतरही कुंभे जलविद्युत प्रकल्प अपूर्णच राहिला असून प्रकल्पाचे काम रखडल्याचे दिसत आहे.

काळ व कुंंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्रत खर्चापेक्षा जास्त झाल्याची सबब सांगून स्थापत्य कामावर कोणताही खर्च करण्यात येऊ नये असे निर्देेश शासनाने दिल्यामुळे कुंभे प्रकल्पाचे काम बंद पडले. त्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय व शासनाने नवीन बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिल्याशिवाय काम सुरू होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे माणगाव व महाड तालुका विकासापासून दूर फेकला गेला. रायगडातील माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत या बहुउद्देशीय प्रकल्पाची योजना माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांची होती. ज्यामुळे वर्षभर नागरिकांच्या वीज व पाणी या मूलभूत गरजांचे हमखास निराकरण होईल तसेच कृषी व उद्योगाला विशेष चालना मिळून मागासलेल्या कोकणाचा विकास होईल अशी त्यांची संकल्पना होती, परंतु त्यांच्या अल्प कारकिर्दीमुळे ही योजना मागे पडली.

कोकणात मुबलक पाऊस होतो. हे पाणी कुंभेसारख्या डोंगरात अडविले तर प्रदूषणविरहीत जलविद्युत प्रकल्पामुळे वर्षभर नियमित वीज-पाणी मिळेल, असे कै. बॅ. अंतुले यांचे स्वप्न होते, मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अपूर्णच राहिलाय. दरम्यान, रखडलेल्या कुंभे जलविद्युत प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने नव्याने मान्यता देऊन तो पुनर्जीवित करावा, अशी  मागणी नागरिकांतून होत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास महाड व माणगाव तालुक्यातील उद्योगधंद्यांत वाढ होऊन पर्यटन व्यवसायाबरोबरच नागरिकांनाही रोजगार उपलब्ध होईल अशी आशा वाटते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply