पनवेल : बातमीदार
लॉकडाउनमुळे मागील दीड महिने बंद असलेली दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर काही टोळ्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन गंडा घालण्यास सुरुवात केली. या टोळीने अशाच पद्धतीने सीवूड्स सेक्टर-42 ए मध्ये राहणार्या एका व्यक्तीकडून ऑनलाइन 42 हजार 568 रुपये उकळल्याचे उघडकीस आले. एनआरआय पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
दीड महिन्यानंतर केंद्र सरकारने दारूविक्रीसाठी परवानगी दिली, मात्र दारू खरेदी करणार्यांची दारूच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सरकारने ऑनलाइन दारूखरेदीचा पर्याय नागरिकांना दिला. याचाच फायदा उचलत ऑनलाइन फसवणूक करणार्या काही टोळ्यांनी गुगलवरून ऑनलाइन घरपोच दारू पुरविण्याची सेवा देत असल्याची जाहिरातबाजी सुरू केली. त्यावर संपर्कासाठी आपले मोबाइल क्रमांकदेखील दिले आहेत.
या मोबाइल फोनवर एखाद्या व्यक्तीने संपर्क साधल्यास या टोळीकडून त्यांना घरपोच दारू पाठवून देण्याचा बहाणा केला जातो. त्यानंतर ही टोळी त्यांना दारूची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या बँक खात्यात असलेली सर्व रक्कम ऑनलाइन आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेत असल्याचे आढळून आले. ऑनलाइन दारू खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सीवूड्स सेक्टर-42मधील सचिन दिवे याने घरपोच दारू पोहोचविण्याची जाहिरात करणार्या श्याम लिकरचा नंबर गुगलवरून मिळविला होता. त्यानंतर सचिनने पाच हजार 300 रुपयांच्या दारूची ऑर्डर दिल्यानंतर समोरील व्यक्तीने पेटीएमद्वारे रक्कम ऑनलाइन पाठविण्यास सांगून सचिनला क्यूआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले. त्याला वेगवेगळी कारणे सांगून त्याच्या बँक खात्यातून 42 हजार 568 रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वळती करून त्याची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.
सावध राहण्याचे आवाहन
ऑनलाइन दारू घरपोच देण्याची जाहिरात करून फसवणूक करणार्यांची माहिती नवी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटरवरून देऊन अशा खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, आपली फसवणूक होऊ शकते, अशा प्रकारचे ट्विट केले.