Breaking News

‘समतेचे दीप लावून डॉ. आंबेडकर जयंती घरीच साजरी करा’

मुंबई : प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले. त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाचे सार समतेच्या तत्त्वात आहे. त्यामुळे समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाच्या 14 एप्रिलला आपल्या घरीच राहून साजरी करताना घराघरात समतेचे दीप लावण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीमजयंती घरीच राहून साजरी करावी; कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढून गर्दी जमविण्याचा प्रयत्न करू नये. भीमजयंती दरवर्षी आपण एप्रिल ते जूनपर्यंत साजरी करतो. यंदा कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा 14 एप्रिलला आपण घरीच राहून भीमजयंती साजरी करावी, असे ना. आठवले यांनी म्हटले आहे.
भीमजयंती दिनी सकाळी 11 वाजता सर्वांनी आपल्या घरी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घ्यावी. पुरणपोळी वा मिठाई वाटावी व त्यानंतर सायंकाळी आपल्या घराच्या दारात समतेचा दिवा लावून महामानव डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील समतावादी भारत साकारण्याचा निर्धार करावा, असेही ना. रामदास आठवले यांनी भीम अनुयायांना उद्देशून सांगितले आहे.
भीमजयंतीनिमित्त  परिसरात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, शहरात मध्यवर्ती चौकांमध्ये डॉ. आंबेडकरांचे पुतळे आहेत, तेथे 14 एप्रिलला पुष्पहार अर्पण करण्यासाठी तीन व्यक्तींना प्रशासनाने परवानगी द्यावी, असेही ना. आठवले यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply