लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडात राजकारण आता चढत्या उन्हाप्रमाणे तापू लागले आहे. या वेळीही जिल्ह्यात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा रंगतदार सामना होणार आहे. युतीतर्फे अनंत गीतेंना या वेळीही उमेदवारी देण्यात आली आहे, तर सन 2014 मध्ये गीतेंकडून पराभव पत्करलेल्या सुनील तटकरेंना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरविलेले आहे. त्यामुळे जुन्याच पैलवानांमध्ये या वेळचे मैदान रंगणार आहे. दोन्ही पैलवान हे कसलेले असल्याने नेमके कोण जिंकणार याबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला शेकापची साथ आहे, तर भाजप-शिवसेनेने पुन्हा एकदा युतीचा नारा दिल्याने शिवसेनेची बाजूही तितकीच मजबूत झाली आहे.
या निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे शेकापवर राष्ट्रवादीने पूर्णपणे अंमल केल्याचे.कारण जिल्ह्यात शेकापची नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या इशार्यावर, तालावरच नाचताना दिसतात. त्यामुळे कधी काळी जिल्ह्यात प्रस्थापित असलेल्या शेकापची अवस्था राष्ट्रवादी बोले, शेकाप डोले अशी झाल्याचे दिसते. दस्तुरखुद्द शेकापचे निष्ठावंत कार्यकर्तेच आता उघडपणे याबाबत बोलू लागले असून, आमचा पक्ष आमच्या नेत्यांनी कोलाडला बांधून ठेवलाय, अशी उपहासात्मक टीकाच शेकापचे कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यांचे हे शल्य वेदनाजनकच आहे. कारण विद्यमान शेकाप नेतृत्व हे पूर्णपणे राष्ट्रवादीच्या आहारी गेल्याचे शेकाप कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे, पण पक्ष नेतृत्वापुढे बोलणार कोण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, अशी अवस्था शेकाप कार्यकर्त्यांची झालेली आहे, मात्र याचा विपरित परिणाम मतदानात होईल, असा गर्भित इशाराही शेकापचेच कार्यकर्ते उघडपणे देऊ लागलेले आहेत. आम्ही आमचे अस्तित्व विसरत चाललोय; काय करणार, अशा खेदजनक प्रतिक्रिया आता नाक्यानाक्यावर ऐकावयास मिळू लागल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही याच तटकरेंना पराभूत करा, असे मतदारांना सांगत होतो आता त्याच मतदारांना कोणत्या तोंडाने सांगू की तुम्ही तटकरेंना मतदान करा, असा उद्विग्न सवाल शेकाप कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. गेल्याच आठवड्यात पनवेल, उरण परिसरात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दौरा केला.
या दौर्यात त्यांनी थेट शेकापच्या बैठकीत येऊनच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी शेकापने झटावे, असे आदेश दिले. वास्तविक दोन्ही पक्षात आघाडी वा युती आहे याचा अर्थ दोन्ही पक्षांनी आपापले अस्तित्व विसरणे योग्य नाही. त्यामुळे शेकापच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करणे हेच कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. आघाडीच्या व्यासपीठावरून आवाहन केले असते, तर आम्ही ते स्वीकारलेही असते, पण आता आमच्या घरातच राष्ट्रवादी घुसून जर आम्हाला आदेश देत असेल, तर आमचे अस्तित्व खरोखरच धोक्यात आले आहे, अशा संतापजनक प्रतिक्रिया शेकापमध्ये उमटू लागल्या आहेत. विद्यमान राजकारणात युत्या, आघाड्या होतच असतात.
कारण आता कोणत्याही पक्षाला परस्परांचा आधार घेतल्याशिवाय निवडणूक लढविणे अशक्य झाले आहे. हे जरी खरे असले तरी आघाडी वा युती करणार्या पक्षांनी आपापले अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जर आम्ही आमचे अस्तित्व टिकवून ठेवले नाही, तर रायगडात काँग्रेससारखी शेकापचीही अवस्था करण्यास राष्ट्रवादी मागेपुढे पाहणार नाही, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. शेकाप नेतृत्वाने जर वेळीच दखल घेतली नाही, तर एक दिवस राष्ट्रवादीत शेकापचे विलिनीकरण झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीसमवेत आघाडी करण्याच्या शेकाप नेतृत्वाच्या या निर्णयावरून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असून, त्याचे प्रत्यंतर चार दिवसांपूर्वी कर्जतमध्ये अजित पवारांच्या संवाद मेळाव्यात दिसून आले. या मेळाव्यावर स्थानिक शेकाप नेते आणि कार्यकर्त्यांनी गैरहजर राहून एकप्रकारे बहिष्कारच टाकला. पनवेलमध्ये झालेल्या अजित पवारांच्या दौर्यातही यामुळे आता रायगडबरोबरच मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. कारण हा रोष असाच निर्माण होत राहिला, तर त्याचे विपरित परिणाम मतदानात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच लोकसभा
निवडणुकीत रायगड आणि मावळ मतदारसंघात शेकाप नेतृत्वाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला, तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच मनापासून राष्ट्रवादीचा प्रचार केला की नाही हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रवादी बोले शेकाप डोले अशीच स्थिती राहणार आहे, हे निश्चित. शेकापने राष्ट्रवादीच्या इतके आहारी जाणे निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही रुचलेले नाही.कारण यामुळे आपण आपलेे असलेले अस्तित्व गमावून बसू आणि राष्ट्रवादीचे
मांडलिकत्व स्वीकारल्यासारखे होईल,अशी भीती व्यक्त होत आहे.
अस्तित्व ढासळतेय
कधी काळी शेकाप हा रायगड जिल्ह्यात प्रस्थापित पक्ष म्हणून ओळखला जात असे, पण आता मात्र या पक्षाची स्थिती गलितगात्र अशीच झालेली आहे.सन 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापला रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने खासदार मिळाला होता. (या दोन्ही निवडणुका शेकाप त्या वेळच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढला होता.) त्यांच्यानंतर आजतागायत शेकापला लोकसभेत आपला उमेदवारच निवडून आणता आलेला नाही हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाहीत. सन 2004 मध्ये रामशेठ ठाकूर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शेकापने पनवेलचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली, पण काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या बॅरिस्टर अ. र. अंतुले यांनी विवेक पाटील यांचा पराभव केला. सन 2009 मध्ये शेकापने शिवसेनेला साथ दिली, तर सन 2014 मध्ये शेकापने चिपळूणचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना रायगडमधून, तर मावळमधून लक्ष्मण जगताप यांना उभे केले, पण या दोन्ही ठिकाणीही शेकापला दारुण पराभव पत्करावा लागला. रायगडमध्ये तर शेकापची अनामतही जप्त झाली. आताच्या निवडणुकीत शेकापने राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. त्यामुळे या वेळी पक्षाचा उमेदवार उभा केलेलाच नाही. भविष्यातही होणार्या लोकसभेच्या निवडणुकीत शेकाप उमेदवार
उभे करील की नाही याबाबत सारेच साशंक आहेत.
-अतुल गुळवणी (9270925201)