नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 2020मध्ये होणार्या फिफाच्या अंडर 17 महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली आहे. ‘फिफा’कडून ही घोषणा करण्यात आली.
मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी भारताने पुरुषांच्या फिफा अंडर 17 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. भारतात महिलांची अंडर 17 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने फुटबॉलच्या जागतिक नकाशावर भारतीय महिला फुटबॉल संघाला छाप उमटवण्याची संधी आहे.
स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने गत अंडर 17 वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. 2018 साली उरुग्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. त्या वेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.