Breaking News

दिलासादायक कामगिरी

गेल्या 24 तासांत देशात आजवर नोंदल्या गेलेल्या कोरोनाच्या एकूण केसेसची संख्या 12 हजार 759 इतकी झाली आहे. पाश्चिमात्य देशांपैकी अनेक देशांमध्ये 12 हजारांहून अधिक केसेसचा हा टप्पा भारताच्या तुलनेत खूपच कमी काळात गाठला गेला होता. फक्त कॅनडा या एकमेव देशाने भारताइतक्याच प्रभावीपणे या साथीचा फैलाव थोपवून धरल्याचे दिसते.

भारताने कोरोनाचा समूह संसर्गाचा टप्पा अद्याप तरी गाठलेला नाही हे बुधवारी केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजारांच्या पुढे गेलेली असताना केंद्राने केलेला हा निर्वाळा दिलासादायकच आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशासाठी कोरोनासारख्या वेगाने पसरणार्‍या घातक विषाणूचा फैलाव रोखणे हे मोठे आव्हानात्मकच होते व आहे, परंतु तरीही तुलनेने भारताने ही आघाडी बरी सांभाळली आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच केंद्र सरकारने वेगाने आणि खंबीरपणाने घेतलेल्या निर्णयांकडे जाते. देशातील कोरोनाबाधितांचा बरे होण्याचा दर (12.02 टक्के) मृत्यूदरापेक्षा (3.3 टक्के) खूपच अधिक आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले. देशात अनेक असे जिल्हे आहेत जिथे गेल्या 28 दिवसांत या साथीचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दक्षिण गोवा, पोरबंदर, पौडी गढवाल, पाटणा आदी 325 जिल्ह्यांचा यात समावेश होतो. या अशा दिलासादायक बाबी लक्षात घेऊनच केंद्र सरकार कोरोनाचा फैलाव न झालेल्या भागांमध्ये औद्योगिक आणि आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा विचार करीत आहे.गेल्या आठवड्यात भारतातील कोरोनाबाधितांची संख्या तीन ते सहा हजारांदरम्यान होती. ती 12 हजारांच्या पुढे जाण्यास अर्थात दुप्पट होण्यास भारतात सहा दिवस लागले. अमेरिका आणि जर्मनीला अशा तर्‍हेने केसेस दुप्पट होऊन 12 हजारांच्या पुढे जाण्यास अवघे दोन दिवस लागले होते, तर इटलीला तीन दिवस आणि ब्रिटन, स्पेन आणि फ्रान्सला चार दिवस लागले होते. बरे आपण कोरोनाच्या चाचण्यांमध्ये कुठे मागे आहोत असा कुणी यातून समज करून घेत असेल तर तसेही नाही. देशात पाच हजार पॉझिटिव्ह केसेस आढळल्या तेव्हा आपण 1.14 लाख इतक्या चाचण्या पूर्ण केल्या होत्या, तर 10 हजार पॉझिटिव्ह केसेसचा टप्पा गाठला गेला तेव्हा भारतात 2.1 लाख इतक्या जणांची कोरोनाची चाचणी झालेली होती. या आघाडीवर फक्त कॅनडाने भारतापेक्षा सरस कामगिरी बजावली आहे असे दिसून येते. या सार्‍यातून आपल्या देशात कोरोनाचे नियंत्रण अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या रीतीने केले जात असल्याचे स्पष्ट होते. तसेच देशात राबवल्या गेलेल्या लॉकडाऊनचे फायदेही अधोरेखित होतात. या सार्‍या बाबी दिलासादायक असल्यानेच आपण कोरोनाचा फैलाव नसलेल्या भागांमध्ये उद्योग व आर्थिक व्यवहारांना मोकळीक देण्याकडे वळू धजतो आहोत. अर्थात हे पाऊल उचलताना साथ रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा अवलंब मात्र कठोरपणे आणि जबाबदारीने करावा लागणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केलेल्या या भागांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळल्यास तिथे पुन्हा कठोरपणे लॉकडाऊन लादला जाईल, असे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 14 तारखेच्या संदेशात स्पष्ट म्हटले होते. तेव्हा आपल्या भागातील लॉकडाऊन लवकर उठावा असे वाटत असल्यास तूर्तास तरी घरी सुरक्षित बसून राहण्याला पर्याय नाही.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply