विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत, साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 28) झिराड येथे आयोजित कार्यक्रमात भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही केले गेले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अशोक वारगे, संतोष पाटील, महेंद्र चौलकर, समीर राणे, महेंद्र वावेकर, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, संध्या गावडे, कल्पना भोईर, किर्ती माने, रवी म्हात्रे, महेश माने आदींसह पदाधिकारी, सदस्य, साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झिराड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेल्या 21 वर्षांपासून शालेय साहित्य वाटपाची परंपरा आहे. ही परंपरा दिलीप भोईर यांनी आजही कायम टिकून ठेवली आहे. पहिली ते आठवीच्या 120 विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील इतके शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत उतीर्ण झालेल्या व विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मनश्री शेडगे, बल्गेरिया देशात जाऊन पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षण घेणारी ऋतुजा चव्हाण, माध्यमिक शालांत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विघ्नेश थळे, शारी घरत, सारा काठे, कुस्तीपटू जय घरत यांचा या वेळी गौरव करण्यात आला. मनश्री शेडगे व विघ्नेश थळे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात दिलीप भोईर यांच्या कामाचे कौतुक केले. दिलीप भोईर चांगले काम करीत आहेत. झिराडमध्ये ते विविध उपक्रम राबवित आहेत. इतरांनी त्यांचे अनुकरण करून आपल्या गावांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करावे, असे ते म्हणाले.