श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात आढळला रुग्ण
अलिबाग ः प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीर भोस्ते गाव सील करण्यात आले आहे. या कोरोना रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 37 झाली आहे.
कोरोनाने रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका आणि उरण तालुक्यात प्रवेश केला होता. यापूर्वी आढळलेले सर्व रुग्ण या दोन तालुक्यांतील होते. तसेच मागील दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली नव्हती. त्यामुळे कोरोनाला पनवेलमध्येच रोखण्यात यश आले असे वाटत होते. त्यामुळे रायगडकर निश्चिंत होते, परंतु आता श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भोस्ते गाव सील करण्यात आले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
मुंबई, वरळी येथून हा व्यक्ती श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात आपल्या कुटुंबासह आला होता. वरळी येथून आल्याने त्याने स्वतः जाऊन खासगी रुग्णालयात आपली तपासणी केली. खासगी डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. श्रीवर्धन शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविले. 12 एप्रिल रोजी या व्यक्तीने रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्या वेळी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. आता या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांनाही क्वारंन्टाइन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
टाळेबंदीमुळे मुंबईतून अनेक जण चालत, समुद्रमार्गे तसेच इतर मार्गांनी रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत आले आहेत. त्यांची तपासणी झाली नव्हती. आता भोस्ते गावात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण रायगड जिल्ह्यात सापडला नव्हता, पण शुक्रवारी पाच रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एक भोस्ते गावातील, तर अन्य चार
पनवेलमधील आहेत.