Breaking News

व्हॉट्सअॅप स्टेटसवरून तलवारीने वार

खोपोली ः प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक करमणुकीचे साधन असलेले व्हॉट्सअ‍ॅप वादाचे कारण ठरले असून व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथे घडली आहे.

मोहपाडा येथे राहणारा सुरज पाटील (28) याचा कॉलेज कट्टा असा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून सुरजने ताकद दाखवायची गोष्ट नसते, वेळ आल्यावर समोरच्याला आपोआप कळते, असे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला स्टेटस ठेवले होते. त्याच ग्रुपवरील निलेश चव्हाण याने दुश्मनांची कमी नाही पण ते म्हणतात ना वाघाची शिकार कुत्र्याकडून नसते होत, असे स्टेटस ठेवले. यावरून सुरज आणि निलेश यांच्यात कॉलेज कट्टा या ग्रुपवर चॅटिंग करता करता वाद झाला. या वादातून बुधवारी संध्याकाळी मोहपाडा येथील जैन मंदिराजवळ निलेश चव्हाण आणि मंदार सोले हे सुरजच्या घरी गेले.

सुरजला घरातून बोलावून निलेशने  शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत जाऊन निलेशने त्याच्या जवळील तलवारीने सुरजवर वार करण्याचा प्रयत्न केला. यात सुरजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मंदार सोलेनेही सुरजला मारहाण केली. या मारहाणीत सुरजच्या गळ्यातील चेन गहाळ झाली. या घटनेनंतर सुरजने रसायनी पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण आणि मंदार सोलेविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी भा. दं. वि. कलम 324, 323, 427, 506(2), 34प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोघेही आरोपी फरार असून, याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. बी. भोईर करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply