माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माणगाव उपविभागात प्रत्येक गावामध्ये कोविड वॉरिअर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींना समाविष्ट केले आहे. त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी दिली.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय शिधापत्रिकेवरील लोकसंख्येनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी एप्रिल ते जूनकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त अन्नधान्य प्रतिसदस्य मोफत वितरित करण्याचे शासनाने आदेश नर्गमित केले आहेत. तसेच एनपीएच शिधापत्रिका लाभार्थ्यांना मे ते जून या कालावधीसाठी प्रति शिधापत्रिका गहू आठ रुपये व तांदूळ 12 रुपये या दराने प्रतिमहा प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे.