नौसैनिक कुणाकुणाला भेटले, त्या सर्वांची होणार चाचणी
मुंबई ः प्रतिनिधी – वेगाने फैलावणार्या कोरोनाच्या जाळ्यात आता भारतीय नौसैनिकही अडकल्याचे समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता नौसेनेकडून ’कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ हे एक मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. याद्वारे नौदलात कोरोनाने शिरकाव कसा केला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. ’कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ ऑपरेशनदरम्यान हे नौसैनिक गेल्या काही दिवसांत कुणाकुणाला भेटले, त्या सर्वांची चाचणी केली जाणार आहे.
जगातील अनेक देशांचे नौसैनिक कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यात आता भारताचाही समावेश झाला आहे. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका ’यूएसएस थेडोर रुझवेल्ट’मध्येही 500 कोरोनाबाधित आढळलेत, तर फ्रान्स नौसेनेलाही कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे.
मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 26वर पोहचली आहे. पहिल्यांदाच भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला. हे सर्व नौसैनिक आयएनएस आंग्रे या नौदलाच्या प्रशासकीय तळावर होते. सध्या नेव्हीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व नौसैनिक पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या कुलाबा येथील आयएनएस आंग्रे या भागात राहतात.
एका नाविकात 7 एप्रिलला लक्षणे दिसली होती. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर 26 नौसैनिकांची चाचणी आता पॉझिटिव्ह आली आहे. हे सर्व जण आयएनएस आंग्रे या नौदलाच्या प्रशासकीय तळावरील आहेत. याच तळावर या नाविकांची राहण्याची सोयही आहे. त्यामुळे त्यांच्या निवासाची जागा असलेल्या संपूर्ण इमारतीचे अलगीकरण करण्यात आले आहे. याच तळाजवळ नौदलाच्या युद्धनौका व पाणबुड्या दुरुस्तीसाठी उभ्या असतात. सुदैवाने त्यावर अद्याप कोरोना पोहचला नाही.