Breaking News

महाडमधील खासगी रुग्णालय सील

पॉझिटिव्ह महिला आढळल्याने खबरदारी; तीन डॉक्टर्सही क्वारंटाइन

महाड ः प्रतिनिधी
पोलादपूरमधील वयोवृद्ध महिला आजारी पडल्यानंतर तिच्यावर महाडमधील डॉ. म्हामणकर हॉस्पिटलमध्ये उपचार करून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असता ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महाडमधील म्हामणकर हे खासगी हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. शिवाय या महिलेची तपासणी करणारे तीन डॉक्टरांनाही क्वारांटाइन करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाडमध्ये प्रचंड घबराट पसरली असून मुंबई, पुणे येथून येणार्‍या नागरिकांना रोखण्यात प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवल्याने ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
पोलादपूरमधील वयोवृद्ध महिला 15 एप्रिल रोजी महाडमधील म्हामणकर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाली होती. या घटनेनंतर म्हामणकर रुग्णालय सील करण्यात येऊन या महिलेवर उपचार करणारे डॉ. आदित्य म्हामणकर, डॉ. हिम्मतराव बावसकर, डॉ. वैभव धारप या तीन डॉक्टरांना क्वारंटाइन केल्याची माहिती महाड ट्रॉमा सेंटरचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिरादार यांनी दिली आहे. यामुळे महाडमध्ये उलटसुलट चर्चांना पेव फुटले असून घबराट पसरली आहे.
दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील करंजाडी येथील एका वृद्धाचा मुंबईमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता, मात्र त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले असून या घटनेनंतर घबराटीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेच्या दृष्टीने घरातच थांबावे, असे आवाहन डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे, परंतु लगेचच पोलादपूरमधील या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आणि तिच्यावर महाडमध्ये उपचार झाल्याने महाडमध्ये तसेच खासगी रुग्णालय सील केल्याने खासगी डॉक्टरांतदेखील घबराट पसरली आहे, मात्र खासगी दवाखान्यातून कशा प्रकारे उपचार करायचे याबाबत खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन देण्यात आल्याचेदेखील डॉ. बिरादार यांनी सांगितले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply