पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 18) सलग दुसर्या दिवशी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पनवेल तालुक्यातील चार आणि उरण व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पनवेल, उरण तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन आणि त्यानंतर पोलादपूरपर्यंत पोहोचला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी कामोठे, खांदा कॉलनी आणि खारघरमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. कामोठे येथील व्यक्ती ताज हॉटेलमध्ये शेफचे काम करीत असून तेथील संक्रमित अन्य आठ व्यक्तिंबरोबर याचा समावेश होता. त्याला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांदा कॉलनीतील 84 वर्षांची व्यक्ती किडनी आणि न्यूमोनियाने दोन वर्षांपासून आजारी होती. तिला पनवेल येथील उपजिल्हा (कोविड) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 20मधील व्यक्ती 17 मार्चपासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात हृदयरोगावर उपचार घेत होती. अशा प्रकारे पनवेल महापालिका क्षेत्रात आता कोरोनाचे 34 रुग्ण झाले आहेत.
पनवेल तालुक्यात नेरे येथील व्यक्ती मुंबईला ओकार्ड हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन आहे. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता ही व्यक्ती पूर्णपणे बरी झाली असून तिला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. जासई रेल्वे कॉलनीतील 24 वर्षीय तरुणाची 11 एप्रिलला मुंबईला जगजीवनराम रुग्णालयात केलेली टेस्ट निगेटिव्ह आल्याने सोडण्यात आले. त्याची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्याला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या रूम पार्टनर, अधिकारी, मुकादम, दूधवाला आणि किराणा दुकानदार यांचीही आता तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल ग्रामीणमध्ये आता कोरोनाचे सात रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्याच्या टोकाला पोहचला कोरोनाचा संसर्ग
पोलादपूर ः शहरातील प्रभातनगर लोकवस्तीत असलेल्या एका वृद्ध जोडप्यापैकी महिलेला तीन दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तिची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. याबाबतची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचल्याचे दिसून येते. दरम्यान, सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या पतीचा हस्तज्योतिषाचा व्यवसाय असल्याचे समजते.
ही महिला कस्तुरबा रुग्णालयात जैसे थे अवस्थेत असून तिच्या मुलाला भांडूप येथील निवासस्थानी क्वारंटाइन करण्यात आले, तर तिच्या पतीला पनवेल येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कोविड-19 विभागात पाठविण्यात आले आहे.
उलवेसह आजूबाजूचा परिसर बाधित क्षेत्र घोषित
अलिबाग ः जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथील साई गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग, सेक्टर-20, प्लॉट क्र. 113 व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 4 मेपर्यंत हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …