पोलिसांनी साहित्य केले घटनास्थळीच नष्ट
रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर व राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी असून अवैध गोष्टींवर धडक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे रोहा पोलिसांनी तालुक्यातील बेलवाडी येथे शनिवारी (दि. 18) छापा टाकून गावठी दारूसह 30 हजार 800 रुपयांचे साहित्य जागीच नष्ट केले.
कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्याकरिता घोषित केलेल्या संचारबंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम आदी सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत तसेच सर्व परवानाधारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत. तथापि काही समाजविघातक घटक आदेशाची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पद्धतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अशा प्रकारे छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सर्व पोलीस ठाणे यांना दिले होते. त्या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरू असताना शनिवारी पहाटे 5च्या सुमारास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बेलवाडी येथे छापा टाकला.
या वेळी जंगल भागात ओव्हळाच्या किनारी दोन ठिकाणी हातभट्टी दारू काढण्यासाठी लागणारे रसायनाचे 10 ड्रम दिसले. त्या ठिकाणी आजूबाजूला कोण इसम आहेत का याचा शोध घेतला असताना कोणीही मिळून आले नाही. दोन पंचांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करून सर्व साहित्य पोलिसांनी नष्ट केले.