Breaking News

करंजा येथील मासेमारी बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छिमारांचा निर्णय

पनवेल : बातमीदार

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिमार आणि संस्थांनी मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण तालुक्यातील करंजा गावातील बहुतांश रहिवासी हे मच्छिमार असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. गावातील आगरी, कोळी बांधव हे मासेमारीच्या या एकमेव व्यवसायावर उपजीविका चालवित असतात. त्यातच, गेल्या वर्षी पावसाळ्यापासून या मच्छिमारांवर मोठे संकट ओढावले आहे. अनेक वेळा वादळांना सामोरे जावे लागल्याने मासेमारीचा हंगाम लांबणीवर जाऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यातच, काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मासेमारीच्या वेळेस मासळीचा तुटवडा जाणवल्याने मच्छिमारांपुढे मोठे संकट उभे राहिले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात आणि राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने अनेक बोटी या समुद्रकिनारी नांगरण्यात आल्या होत्या. मुंबईतील ससून डॉक येथील मत्स्यविक्री व्यवसायदेखील बंद करण्यात आल्याने निर्यातही बंद झाली आहे. याचदरम्यान, या मच्छिमारांनी गावपातळीवर मासळीची विक्री केल्याने आसपासच्या तालुक्यांतील रहिवाशांनीदेखील मासळी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करीत सुरक्षित वावराच्या नियमाचा बोजवारा उडविला होता. कोरोनाबाधित क्षेत्रांतून येणार्‍या या खरेदीदारांमुळे करोनाचा प्रादुर्भाव करंजा परिसरात होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे, स्थानिक मच्छिमार आणि मच्छिमार संघटनांनी एकत्रित निर्णय घेऊन करंजा परिसरातील मासेमारी ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी सांगितले. या संदर्भातील पत्रदेखील रायगडचे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आले असून करंजा परिसरात मच्छिमारी करणार्‍या बोटींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

मच्छिमार आणि गावकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करंजा परिसरातील सहा सिलिंडरचे 354 ट्रॉलर आणि एक ते चार सिलिंडरच्या 23 बोटी येत्या 3 मेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, मासेमारी बंदीचे उल्लंघन करणार्‍या मच्छिमारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून आर्थिक नुकसानपेक्षा आयुष्य महत्त्वाचे असल्याचे मच्छिमारांनी म्हटले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply