महाड : प्रतिनिधी – पोलीस म्हणजे कडक, निर्दयी आणि निष्ठूर अशी सर्वसामान्यांचा समज असतो, परंतु पोलिसांमध्येही माणुसकी असते याचा प्रत्यय महाडमध्ये आला. तेथील दामिनी पथकात असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनल बर्डे यांनी निराधान वृद्धाला आधार देत जीवनदान दिले आहे.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून शासनाने त्यावर आळा घालण्याकरिता लॉकडाऊन केला असून यामुळे काही लोकांची उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत महाड शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस सोनल शिवाजी बर्डे या दामिनी पथकात काम करीत असताना फेबु्रवारी महिन्या त्यांना महाड शहर येथील पी. जी. सीटी. येथे एका खड्ड्यात एक वृद्ध इसम पडलेल्या अवस्थेत दिसले. तेव्हा त्या त्यांच्याजवळ गेल्या असता ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना महिला पोलीस शिपाई यांनी तेथील कामगारांच्या मदतीने उचलून पाणी पाजले तेव्हा ते शुद्धीवर आले, परंतु ते बरेच दिवस उपाशी राहिल्याने त्यांना काहीच बोलता येत नव्हते. त्या वेळी महिला पोलीस शिपाई यांनी त्यांना केळी, बिस्किट्स खाण्याकरिता दिले. व दररोज त्या त्यांना काहीना काही खाण्यास घेऊन येत असत. तेव्हा त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा झालेली पाहून महिला कर्मचारी सोनल बर्डे यांनी तेथे बंदोबस्ताकरिता आलेल्या महिला कर्मचारी श्वेता पंगेरकर नेमणूक मुख्यालय यांच्या व तेथील कामगारांच्या मदतीने त्या वृद्ध बाबांसाठी पाणी व कपडे उपलब्ध करून त्यांना दोन्ही महिला कर्मचारी यांनी तेथील कामगारांच्या मदतीने अंघोळ घालून स्वच्छ कपडे त्यांना घालण्याकरिता दिले. त्यानंतर ते थोडे थोडे बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बर्डे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना बाबा तुमच नाव काय, तुम्ही कुठे राहता अशी विचारणा केली असता त्या वृद्ध इसमाच्या अंगात त्राण नसल्याने उच्चार स्पष्ट येत नसले तरी ते बर्डे यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते. थोड्या दिवसांनी ते थोडे थोडे बोलू लागले. त्यावर बर्डे यांनी पोलादपूर पोलीस ठाणेचे कर्मचारी यांना त्या वृद्ध इसमाचे नाव व पत्ता देऊन चौकशी करण्यास सांगितले असता, ही व्यक्ती त्या गावात राहत नसल्याचे समजले.
सध्या ते वयोवृद्ध इसम महाड शहर येथील पी.जी.सीटी मॉल समोर रस्त्यालगत एका नादुरुस्त टेम्पोखाली आपले वास्तव्य करीत असून त्यांना सोनल बर्डे रोज
त्यांच्या जेवणाची सोय करून त्यांची काळजी घेत आहेत.