कर्जत : बातमीदार
लॉकडाऊन आणि संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्या 33 जणांना नेरळ पोलिसांनी रविवारी
(दि. 19) पकडले. यातील बहुतांश जण हे जेष्ठ नागरिक असल्याने सर्वांना समज देऊन सोडण्यात आले, मात्र यापुढे कुणीही अशा प्रकारे फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संचारबंदीबाबत अनेक जण जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. नेरळ-माथेरान घाटरस्ता आणि कर्जत-कल्याण राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन लोकांनी एकत्र जमू नये असे नेरळ पोलीस सातत्याने ध्वनिक्षेपकावरून सांगत आहेत. तरीदेखील रस्त्यांवर फिरणारे ऐकत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी रविवारी पहाटेपासूनच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर फिरणार्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील आणि उपनिरीक्षक टी. एस. सावंजी यांनी दोन पोलीस व्हॅनच्या माध्यमातून सर्व भागातील रस्ते पालथे घातले. त्यात 7 वाजेपर्यंत तब्बल 33 जण पोलिसांच्या हाती लागले. पकडण्यात आलेल्या सर्वांना नेरळ पोलीस ठाणे येथील मैदानात बसवून ठेवण्यात आले. या 33 जणांमध्ये 22 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश होता. यातील बहुतांश जण वृद्ध असल्याने तसेच मॉर्निंग वॉकबाबतची पहिलीच कारवाई असल्याने सर्वांना समज देऊन सोडून देण्यात आले.