Breaking News

खोपोलीत लॉकडाऊनचे नियम पायदळी; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा; संचारबंदी उठल्यासारखी स्थिती

खोपोली ः प्रतिनिधी

नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण या भागातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. दरम्यान, श्रीवर्धन, पोलादपूर व आता कर्जत तालुक्यातील नेरळमध्येही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर खोपोली व खालापूर तालुक्यात प्रशासनाकडून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र याचा कोणताही गंभीर परिणाम नागरिकांवर होत नसल्याचे चित्र आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक भाजीपाला, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा बहाणा करून विविध रस्ते, चौक व बाजारात गर्दी करीत आहेत.

वाहनांची वर्दळ रोखण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही विविध मार्ग शोधून दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी कायम आहे. विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले व अत्यावश्यक सेवा म्हणून पास प्राप्त असलेल्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत असून, ही मंडळी सर्व नियम धाब्यावर बसवून बिनदिक्कतपणे वाहने फिरवत आहेत.मंगळवारी सकाळी येथील भाजीपाला, किराणा दुकाने व अन्य ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. या वेळी अनेक नागरिक मास्कशिवाय व सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी न घेता मोकाटपणे सर्वकाही सामान्य असल्यासारखे फिरत होते. विविध ठिकाणी तैनात पोलीस नागरिकांना समजावत होते, पण त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नसल्याने खोपोलीत लॉकडाऊन किंवा संचारबंदी उठली की काय अशीच स्थिती बनली आहे. विशेष म्हणजे दोन दिवस पोलिसी कारवाईनंतरही खोपोलीत मॉर्निंग वॉक तसेच संध्याकाळी फिरणार्‍यांची संख्या कमी होत नाही. बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरील गर्दीही कायम आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply