Breaking News

रायगडात 1,03,026 व्यक्तींची ‘घरवापसी’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

अलिबाग, माणगाव : प्रतिनिधी

कोरोनामुळे टाळेबंदी (लॉकडाऊन)च्या काळात मुंबई, पुण्यासह अन्य भागातील चाकरमान्यांनी सुरक्षित ठिकाण म्हणून गावाकडची वाट धरली. जवळपास एक लाखाहून अधिक चाकरमानी रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आले आहेत. यात सर्वाधिक चाकरमानी माणगाव, तर सर्वांत कमी पनवेल तालुक्यातील आहेत. माणसांचा लोंढा वाढल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचप्रमाणे माहिती लपविणार्‍यांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

सर्व वाहतूक सेवा बंद असल्याने अनेक जण रस्त्याने, रेल्वे रुळाने चालत येत आहेत. ही संख्या आता लाखावर पोहचली आहे. लॉकडाऊन काळात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात 11,560, कर्जत 637, खालापूर 1262, पेण 2,670, पनवेल 172, पोलादपूर 7,427, महाड 12,033, म्हसळा 8,894, मुरूड 4058, सुधागड 8029, श्रीवर्धन 6474, रोहा 5056, तळा 8324, उरण 368 असे एकूण 95,211 चाकरमानी व नागरिक मुंबई, पुणे  आणि परजिल्ह्यातून आले आहेत. याशिवाय परदेशातून 393, तर परराज्यातून 7,423 लोक मिळून एक लाख तीन हजार 26 लोक रायगडमध्ये आले आहेत.

या अतिरिक्त लोंढ्यामुळे जिल्हा प्रशासनावर अधिक ताण पडत आहे, परंतु जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. इतक्या यातना आणि यातायात करून घराकडे आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी झाली.

खबरदारी म्हणून त्यांचे 14 दिवस अलगीकरण केले तसेच त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. ज्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही त्यांच्यावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य प्रशासन यांनी संयुक्तरीत्या जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांनीही शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कुणीही घाबरून जाऊ नये. -दिलीप हळदे, सीईओ, राजिप

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply